
एडनच्या आखाताजवळ महत्त्वपूर्ण कारवाईत नौदलाच्या ‘आयएनएस तर्कश’ या युद्धनौकेने २५०० किलो अमली पदार्थ जप्त केले. व्यूहरचनात्मक मोहिमेद्वारे ही कारवाई करण्यात आली. त्यात हवाई देखरेखीसह कमांडोंचादेखील सहभाग होता. ही युद्धनौका मुंबईत मुख्यालय असलेल्या पश्चिम नौदल कमांडचा भाग असून, त्याअंतर्गत या कमांडच्या मार्गदर्शनाखालीच ही कारवाई करण्यात आली.एडनच्या आखातात सोमालियन चाचेगिरी व हुती दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्यामुळे भारतासह जगभरातील समुद्री व्यापार संकटात आला आहे. त्याचा सामना करण्यासाठी भारतासह विविध देशांच्या नौदलांनी संयुक्त कृती दल तयार केला आहे. त्याअंतर्गत समुद्रातील सर्व प्रकारच्या संशयित हालचालींवर देखरेख ठेवली जाते. त्याअंतर्गतच ‘आयएनएस तर्कश’ने ही महत्त्वाची कारवाई केली आहे.
नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, ‘धोऊ’ प्रकारातील संशयित नौका एडनच्या आखाताजवळ फिरत होती. नौदलाच्या पोसॉयडन ८ आय (पी८आय) या टेहळणी विमानाने या हालचाली टीपून तशी माहिती आयएनएस तर्कशला दिली. युद्धनौकेकडून हेलिकॉप्टरच्या साहाय्याने घिरट्या मारुन त्या संशयित नौकेवर सातत्याने देखरेख ठेवली जात होती. संशय निश्चित झाल्यानंतर युद्धनौकेवरील समुद्री कमांडो म्हणजेच मार्कोसचे पथक संबंधित संशयित नौकेच्या जवळ जात पूर्वसूचनेविना नौकेवर धडकले. त्यानंतर नौकेची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ असल्याचे दिसून आले.’कमांडो पथकांनी या नौकेची विस्तृत तपासणी केली.
त्यावेळी त्यामध्ये २३८६ किलो हशीश व १२१ किलो हेरॉइन हे आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर बाजारातील सर्वाधिक महागडे अमली पदार्थ असल्याचे दिसून आले. त्याची बाजारातील किंमत ३ हजार कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले.अरबी देशांमध्ये अनेक वर्षांपासून लाकडी व्यापारी जहाजांचा वापर होतो. या नौकांना ‘धोऊ’ (इंग्रजी डीएचओडब्ल्यू) संबोधले जाते. या नौका मच्छिमार बोटीप्रमाणे लाकडाच्या असतात, मात्र त्यांचे आकारमान लहान व्यापारी जहाजांसारखे असते. एडनच्या आखाताच्या परिसरात सहसा केवळ व्यापारी जहाजांची किंवा युद्धनौकांची ये-जा असते. या स्थितीत ‘धोऊ’ तिथे का व कशी आली? या संशयातून नौदलाने देखरेख केली व त्यात हे अमली पदार्थ हाती आले.समुद्री चाच्यांपासून व्यापारी जहाजांना संरक्षण देण्यासाठी जगभरातील नौदलांनी उभ्या केलेल्या संयुक्त कृती दलांचा (सीटीएफ) ‘आयएनएस तर्कश’ हा एक भाग आहे. ‘सीटीएफ १५०’ अंतर्गत फ्रिगेट श्रेणीतील ही युद्धनौका तेथे सातत्याने गस्तीवर आहे. ‘सीटीएफ १५०’ च्या मोहिमेचे नाव ‘ॲन्झॅक टायगर’ असे आहे. याच मोहिमेंतर्गत भारतीय नौदलाचे पुढाकार घेऊन ही कारवाई केली आहे.
Video Player
00:00
00:00