हरियाणा येथे एका योग शिक्षकाला जिवंत पुरण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या शिक्षकाला विवाहबाह्य संबंधातून संपवण्यात आल्याचं समोर आलं आहे.गेल्या काही दिवसांपासून प्रेमप्रकरणातून होणाऱ्या हत्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. काहीच दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील मेरठ येथील सौरभ राजपूतची त्याच्या पत्नी आणि प्रियकराकडून हत्या करण्यात आल्याचं समोर आलं होतं. या दोघांनी सौरभची हत्या करुन त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर एका ड्रममध्ये भरुन त्यात सिमेंट टाकलं. या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला आहे. आता हरियाणाच्या रोहतकमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे प्रेमप्रकरणातून बाबा मस्तनाथ विद्यापीठातील योग शिक्षक जगदीप यांचे अपहरण करून त्यांना ६१ किलोमीटर अंतरावर असलेल्या चरखी दादरीच्या पंतावास गावात जिवंत गाडण्यात आले.











