दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.
धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असताना प्रत्येक शिक्षक हा विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक तसेच पालकही असतो. विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण देणे ही केवळ जबाबदारी नसून एक मोठी सामाजिक बांधिलकी आहे. त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानून शिक्षकांनी कार्य करावे, असे आवाहन धरणगाव तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी डॉ. भावनाताई भोसले यांनी केले. त्या धरणगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक १ येथे आयोजित धरणगाव तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या थेरेपी सेवा शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. यावेळी धरणगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र सैंदाणे, जिल्हा समन्वयक राहुल चौधरी, झुरखेडा केंद्रप्रमुख विकास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. समग्र शिक्षा अंतर्गत समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत गट साधन केंद्र, पंचायत समिती शिक्षण विभाग धरणगाव यांच्या वतीने ० ते १८ वयोगटातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्पीच थेरपी, फिजिओथेरपी व ऑक्युपेशन थेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तालुक्यातील विविध माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील दिव्यांग विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरामध्ये विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना आवश्यक थेरपी सेवांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. फिजिओथेरपीसाठी विद्यार्थ्यांची तपासणी यश हेल्थ केअर सेंटर अँड पॉली क्लिनिक येथे करण्यात आली. यावेळी डॉ. यश ओसवाल व डॉ. अश्विन कोल्हे यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली, तर सिस्टर पूजा नेतकर यांनी विद्यार्थ्यांची नोंदणी केली. स्पीच थेरपीचे प्रशिक्षण मूकबधिर विद्यालयाचे रोहन पवार यांनी दिले. या शिबिरामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध सेवा-सुविधा उपलब्ध होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाला मदत होणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन समावेशित शिक्षण तज्ञ तुळशिराम सैंदाणे यांनी केले, तर आभार दिपक पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिपक पाटील, अनिल पाटील, नरेंद्र चौधरी, उमेश पाटील, राहुल वाणी, श्रीमती सविता शिंदे, श्रीमती भारती ठाकरे व श्रीमती संगीता वाघ यांनी प्रयत्न केले.









