मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.
प्रतिनिधी | प्रणित काठोके , मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या सुधारणा आणि मजबुतीकरणासाठी राज्य सरकारने सुमारे २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्याच्या ६ मार्च २०२६ रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून मतदारसंघातील एकूण १३ रस्त्यांच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे.
या रस्त्यांच्या कामांसाठी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्याचे सांगितले जाते. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंगराजे भोसले यांच्याकडे मागणी मांडली होती.
मंजूर झालेल्या निधीतून मुक्ताईनगर, बोदवड आणि रावेर तालुक्यातील विविध गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण तसेच काही ठिकाणी संरक्षक भिंती आणि लहान पुलांचे बांधकाम करण्यात येणार आहे. या कामांमुळे ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यामध्ये रावेर-पातोडी-पिंपरी-नांदू-डोलारखेडा मार्ग, नायगाव-सावखेडा-दहिगाव-यावल-भुसावळ मार्ग, खिरोदा-चिनावल-वडगाव-निंभोरा मार्ग तसेच मुक्ताईनगर, बोदवड आणि रावेर तालुक्यातील इतर प्रमुख मार्गांचा समावेश आहे. काही रस्त्यांवर डांबरीकरण व मजबुतीकरणाची कामे करण्यात येणार असून काही ठिकाणी पुलांचे बांधकामही प्रस्तावित आहे.
गेल्या काही काळापासून या रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत होती. निधी मंजूर झाल्यानंतर संबंधित विभागाकडून पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून टप्प्याटप्प्याने कामे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते सुधारण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. मंजूर झालेल्या निधीतून नागरिकांना दळणवळणाच्या सुविधा अधिक चांगल्या मिळतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.







