समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

खिरोदा, ता. रावेर (दि. ९ एप्रिल २०२६) : धनाजी नाना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, खिरोदा येथे समता फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ड्रेस डिझायनिंग व टेलरिंग प्रशिक्षण उपक्रमांतर्गत गरजू महिला व विद्यार्थिनींना ५ शिवण मशीनचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष कुमारदादा चौधरी यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
समता फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी व घरकामासोबत व्यवसायातून कुटुंबाला आर्थिक हातभार लावता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती समन्वयिका आशा सुनील तडवी यांनी दिली. माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम परिसरातील महिला व युवतींसाठी सुरू करण्यात आला असून आतापर्यंत एकूण ३१ शिवण मशीनचे वाटप करण्यात आले आहे.

यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक एस. पी. चौधरी, संचालक रोहिणीताई चौधरी, मनीषा महाजन, प्रा. रमेश झांबरे, अशोक कोलते, पोलिस पाटील विशाल वाघ, समन्वयिका आशा सुनील तडवी, किर्ती भिरूड, रुबीना तडवी, राजश्री कोलते तसेच परिसरातील महिला, विद्यार्थिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. खिरोदा, रोझोदा, सावखेडा, जानोरी परिसरातील महिला व माजी विद्यार्थिनींसह आतापर्यंत दोन हजार तीनशेहून अधिक लाभार्थींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतल्याची माहिती देण्यात आली.
या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत अध्यक्ष कुमारदादा चौधरी यांनी समता फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मनीषा पाटील यांनी केले.







