स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरानं सादर केलेल्या एका विडंबन गीतावरुन सध्या वातावरण तापलं आहे. या गाण्यातून कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अपमान केल्याचा शिवसेनेचा दावा आहे.: स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरानं सादर केलेल्या एका विडंबन गीतावरुन सध्या वातावरण तापलं आहे. या गाण्यातून कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अपमान केल्याचा शिवसेनेचा दावा आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी कामराला धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे. त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झालेल्या आहेत. कामरानं मुंबईच्या खारमधील हॅबिटट स्टुडिओत स्टँड अप कॉमेडी शो केला होता. त्या स्टुडिओत घुसून शिवसैनिकांनी तोडफोड केली.दिल तो पागल है सिनेमातील ‘भोली सी सूरत आँखो मे मस्ती’ या गाण्याच्या चालीवर कामरानं ‘ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी, आँखो पे चष्मा हाये.. मेरी नझर से तुम देखो तो गद्दार नजर वो आए’ हे गीत सादर केलं. रविवारी रात्री यूट्यूबवर कामरानं व्हिडीओ अपलोड होताच सोमवारी वादंग सुरु झाला. यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित झाला. विशेष म्हणजे कामराचं समर्थन आणि त्याचा विरोध करणाऱ्या बाजूंकडून हाच मुद्दा उपस्थित करण्यात आला. आपलं मत मांडण्याचा अधिकार कामराला आहे, त्यात गैर काय, असा प्रश्न त्याच्या बाजूनं उभ्या राहिलेल्यांनी विचारला.











