
नाशिकमध्ये दोन दिवसांत 4 तर 8 दिवसांत 5 गावठी कट्टे नाशिक पोलिसांनी जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. नाशिकमध्ये गावठी कट्टे मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिकमध्ये विनापरवाना देशी बनावटीचे कट्टे घेऊन फिरणारे आणि त्यांना कट्टे आणून देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नाशिककरांकडून होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गुंडाविरोधी पथक नाशिक रोड परिसरात गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत पथकाला माहिती मिळाली की, विहितगाव येथील महाराजा बस स्टॉपजवळ सोमेश्वर हंगरके (27) हा तरुण देशी कट्टा सोबत घेऊन फिरत आहे. त्या अनुषंगाने गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व त्यांच्या टीमने सोमेश्वर याचा पाठलाग करत त्याला शिताफीने पकडले.
त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचा कट्टा त्यासोबत एक जिवंत काडतुस असा एकूण 30 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे तर गुन्हे शाखा दोनच्या पथकाने दोन कारवाईत 3 गावठी कट्टे पकडले आहे. एकूणच नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि गुंडाविरोधी पथकाने 8 दिवसांत 5 देशी बनावटीचे कट्टे आणि जिवंत काडतुसे जप्त करत चौघांना ताब्यात घेतले आहे. कारवाईत 5 कट्टे आणि 11 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे नाशिकरांनी स्वागत केले आहे. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने नाशिकमध्ये गावठी कट्टे मिळत असल्याने खरोखर ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मध्ये विनापरवाना देशी बनावटीचे कट्टे घेऊन फिरणारे आणि त्यांना कट्टे आणून देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.