नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर प्रथम पारोळा तालुक्याची शासकीय विभागांची आढावा बैठक आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व उपविभागीय अधिकारी मनिष गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.प्रसंगी जि.प.मा.कृषि सभापती डॉ.दिनकर पाटील, तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, शहरप्रमुख अमृतभाऊ चौधरी, शेतकी संघाचे संचालक साहेबराव पाटील यांचेसह पारोळा तालुक्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बांधव उपस्थित होते.

यात विविध विभागांचा आढावा घेवुन झालेली कामे, सुरू असलेली कामे व भविष्यातील नियोजित कामांचा आराखडा जाणुन घेण्यात आला.नगरपरिषद अंतर्गत येणारे पारोळा शहर हद्दवाढ प्रस्ताव तयार करणे, नगरपरिषद प्रशस्त इमारत प्रस्ताव तयार करणे, भुयारी गटार योजनेचा कामाला सुरूवात करणे, मंजुर असलेली पाणीपुरवठा योजना मार्चपर्यंत पुर्ण करणे, शहरातील स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष देणे, पंचायत समिती व पोलीस ठाणे इमारत बांधकामासाठीचा प्रस्ताव तयार करणे, आरोग्य सेवा बळकटी करणासाठी आवश्यक उपाययोजना करणे, पंचायत समिती अंतर्गत मंजुर कामांचा तांत्रिक अडचणी दुर करून तातडीने कामे सुरू करा यांसह विविध महत्वपुर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच दैनंदिन वैयक्तिक लाभासाठी गोर-गरिब व सर्वसामान्य नागरिकाला मोठी भटकंती करावी लागते, ह्या दैनंदिन समस्या पुर्णपणे थांबाव्या, कुठल्याही नागरिकाची तक्रार माझ्याकडे येणार नाही याची दक्षता घेवुन कामाप्रती तत्परता दाखवण्याचा सुचना आमदार अमोलदादा पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.










