बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बनावट माहितीच्या आधारे तब्बल ६६ कोटी ५० लाख ५७ हजार ४० रुपये अपहार करण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी ५ CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर) केंद्रचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नेमके प्रकरण काय?
‘पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२५-२६ (आंबिया बहार)’ अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केळी पिकासाठी विमा अर्ज सादर करण्यात आले होते. मात्र विमा कंपनी आणि कृषी विभागाच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली. Maharashtra Remote Sensing Application Centre (MRSAC), नागपूर यांच्या उपग्रह छायाचित्रांच्या अहवालानुसार, तालुक्यातील १२,६२९.८३ हेक्टर क्षेत्रावर बनावट केळी पिकाचा पेरा दाखवण्यात आला होता.
अशी झाली फसवणूक तपासात असे निष्पन्न झाले की: ५२६५ अर्जदारांच्या क्षेत्रावर ४०% पेक्षा कमी किंवा अजिबात केळी पीक नव्हते तरीही CSC केंद्रचालकांनी संगनमताने: बनावट ७/१२ उतारे तयार केले खोटी माहिती विमा पोर्टलवर अपलोड केली शासनाच्या अनुदानाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला कारवाईचा बडगा तालुका कृषी अधिकारी प्रथमेश थोरात यांच्या फिर्यादीवरून खालील ५ CSC केंद्रचालकांवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(२) आणि ३१८(४) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत: निलेश पाटील (उचदा) – ₹१०.६८ लाख अनिरुद्ध अहिरे – ₹८८.६५ लाख चिरायू चौधरी – ₹१.१३ कोटी विजय पाटील (अंतुर्ली) – ₹१.१६ कोटी दिगंबर चौधरी (कर्की) – ₹१.७७ कोटी

जिल्हाभरात मोठा घोटाळा?
विमा कंपनीच्या अहवालानुसार, जळगाव जिल्ह्यातील ४८ CSC केंद्रांवरून अशा प्रकारे शंभरहून अधिक बोगस अर्ज सादर करण्यात आल्याची शक्यता आहे. मुक्ताईनगरमधील कारवाई ही या प्रकरणातील पहिली मोठी कारवाई मानली जात आहे. प्रशासनाचा इशारा कृषी विभागाने स्पष्ट इशारा दिला आहे की, “विमा पोर्टलवर माहिती भरताना झालेल्या कोणत्याही चुकीसाठी किंवा गैरव्यवहारासाठी संबंधित CSC केंद्रचालकच जबाबदार राहील. शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा हडप करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही.”
या प्रकरणाचा पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पोलीस नाईक संदीप वानखेडे तपास करत आहेत.







