हिवाळ्याचे दिवस असल्याने पहाटे चुलीजवळ बसून अभ्यास करीत असलेल्या एका विद्यार्थिनीचा जळाल्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी मरामजोब या गावात घडली. चांदणी किशोर शहारे (वय १७) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चांदणी ही देवरी तालुक्यातील मुरदोली येथील शिवराम महाविद्यालयात अकराव्या वर्गामध्ये शिकत होती. शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता चुलीजवळ बसून ती अभ्यास करीत होती. दरम्यान, अचानक लागलेल्या आगीत चांदणी जळाली. गंभीर अवस्थेत तिला प्रथम ग्रामीण रुग्णालय देवरी येथे दाखल करण्यात आले. नंतर गोंदियाला हलविण्यात आले. मात्र, प्रकृती अधिकच खालावल्याने तिला नागपूरला हलविण्यात आले. नागपुरातील मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास चांदणीचा मृत्यू झाला.









