मुंब्रा येथे झालेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेत जीआरपी जवान विकी मुख्यदल यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.रात्रपाळीचे कर्तव्य पूर्ण करून घराकडे निघालेले रेल्वे पोलिस (जीआरपी) विकी मुख्यदल मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत मृत्यू झाला. मंगळवारी जुमडा येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरची मानवंदना देण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो नागरिक जमले होते. वटपौर्णिमेला एकीकडे सुहासिनी आपल्या पतीराजाच्या दीर्घायुष्यासाठी मनोकामना करीत होत्या, तर दुसरीकडे विकी यांच्या पत्नी दीपालीवर पतीला अखेरचा निरोप देण्याची वेळ आली.
मुंब्रा रेल्वे अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. यातील विकी हे एक होते. मंगळवारी त्यांचे पार्थिव मूळ गावी आणण्यात आले. भिवगाव ते जुमडा गावादरम्यान देशभक्तीपर गीते वाजवित त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अधिकाऱ्यांसह उपस्थितांनी पुष्पचक्र वाहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. पोलिस दलाच्या पथकाने बिगुल फुंकला तसेच बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. चिमुकला मुलगा प्रणयने पित्याच्या चितेला भडाग्नी दिला.










