उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांमुळे गेल्या काही महिन्यांपासून वारंवार अडचणीत येत आहे. सुरुवातीला बीडचा वाल्मिक कराड, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अटकेत असलेले राजेंद्र हगवणे आणि कुटुंबीय, पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात अटकेत असलेला शंतनू कुकडे आणि शंतनू कुकडे बरोबर आर्थिक व्यवहार असणारे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर. या सगळ्या नेत्यांमुळे अजित पवारांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यातच भर म्हणून आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक पदाधिकारी आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा निकटवर्तीय असणारा तुषार वाजंत्री याचे काळे कारनामे समोर आले आहेत.मनी लॉड्रिंग व्यवहारात डिजिटल अटक करण्याची भीती दाखवून पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची तुषार वाजंत्री याने सहा कोटी 29 लाख रुपयांना फसवणूक केली होती.
या प्रकरणी या सायबर चोरट्याला पनवेल परिसरातून अटक करण्यात आली असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. इतकंच नाही, तर तो विविध राज्यांमध्ये पाच सायबर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळे आता या वाजंत्रीच्या अडचणीत वाढ झाली असून वाजंत्री कुटुंबाचे राजकीय कनेक्शनसुद्धा समोर आले आहेत.या तुषार वाजंत्री याचे वडील हरिश्चंद्र वाजंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहा तालुका उपाध्यक्ष आहेत. तुषारची पत्नी तेजस्विनी वाजंत्री ही कोकबेन या गावची राष्ट्रवादी काँग्रेसची सरपंच आहे. इतकंच नाही तर हे वाजंत्री कुटुंब सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्या प्रचारात हे कुटुंब सर्वात पुढे होते.
इतकंच नाही तर या वाजंत्री कुटुंबाचे इतर सुद्धा काही काळे धंदे असल्याची माहिती समोर आली आहे. पेशाने बांधकाम व्यावसायिक असणारं हे कुटुंब जुगाराच्या काळ्या धंद्यात सुद्धा तितकंच पुढे असल्याची माहिती मिळाली आहे. राजकीय वरदहस्ताने रायगड जिल्ह्यात दोन जुगाराचे क्लब सुद्धा वाजंत्रीचे असल्याची माहिती आहे. मात्र स्थानिकांनी अनेकदा तक्रार करून सुद्धा यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळेच बड्या राजकीय नेत्यांच्या वरदहस्ताखाली हे वाजंत्री कुटुंब आपले काळे कारणामे करतय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.










