
छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील वाद विकोपाला गेला आहे. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात राजकीय संघर्ष बघायला मिळत आहे. खैरे यांनी आपण दानवे यांची उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सुरु असलेली धुसफूस अद्यापही कायम आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात एकाच पक्षात शितयुद्ध रंगलं आहे. विशेष म्हणजे चंद्रकांत खैरे यांच्याकडून वारंवार एकत्र मिळून काम करण्याचं आवाहन केलं जात आहे. खैरे यांच्याकडून प्रचंड पोटतिडकीने एकत्रितपणे काम करण्याचं आवाहन केलं जात आहे. खैरे यांनी आजदेखील पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. ठाकरे गटाचा नुकताच मेळावा पार पडला. या मेळव्यात खैरेंनी दांडी मारली. याबाबतही खैरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
“मी मेळाव्याला दांडी मारली हे म्हणणं अतिउत्साहांचं आहे. माझा 2 महिन्यांपासून ठरलेला नागपूरमध्ये कार्यक्रम होता. तिकडे गेलो होतो. मला पक्षाच्या कालच्या कार्यक्रमाबाबत कुणी सांगितलं नव्हतं. मला कार्यकर्त्यांसोबत बोलायचं होतं. मात्र मी नसताना यांनी कार्यक्रम उरकवून टाकला. मला आमंत्रण नव्हते. पत्रिकेत माझे नाव नव्हते. मला विचारायला हवे, मला डावलून कसे चालेल? उद्धवजी संकटात आहेत. एकत्र येऊन काम करावे लागेल, कुणी गटबाजी करत असेल तर मला हे मान्य नाही”, अशी रोखठोक भूमिका चंद्रकांत खैरे यांनी मांडली.”मी मरेन पण पक्ष सोडणार नाही. तरी काही लोक काड्या करत राहतात. अनेक जण कुठे-कुठे जातात, कोण कसे एडजस्टमेंट करतात मला माहिती आहे. कार्यक्रम असा अचानक होतो का? मी स्वतः कार्यक्रमासाठी छोट्या मोठ्यांना फोन करतो. पक्ष मोठा करायचा दिलं सोडून आणि गटबाजी करतात. मी अजूनही काम करतो. अनेक लोक सोडून चालले. ते बरं नाही. आम्ही मदत करायला हवी”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.”अंबादास दानवे यांनी मला सांगितलं नाही. मी उद्धव ठाकरे यांना सांगणार आहे. त्यांच्याकडे तक्रार करणार आहे. अंबादास मोठा झाल्यासारखा वागतो, शिवसेना मी वाढवली, हा नंतर आला आणि काड्या करण्याचे काम करतो. तो मला बोलतच नाही. मी माझं आंदोलन करणार तो करेल ना करेल. आंदोलन आम्ही करणार आणि नक्की करणार. पक्ष चालवायचा असेल तर एकत्र पाहिजे. या माणसामुळे शिवसेनेतील अनेक लोक फुटली, या माणसाने काय केलं सांगा. अनेक लोक सोडून जाताय”, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली.