
बीडच्या जिल्हा रुग्णालयात सलग दुसऱ्या दिवशी मातेचा मृत्यू झाल्याने रुग्णालयात नेमकं चाललंय काय? असा सवाल उपस्थित होत आहे.पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका महिलेचा प्रसतुीदरम्यान मृत्यू झाला होता. उपचाराच्या दिरंगाईने आणि रुग्णालयाने उपचारासाठी 20 लाख रुपये मागितले. वेळेत रक्कम न भरल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत होता. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता बीडच्या जिल्हा रुग्णालयात सलग दुसऱ्या दिवशी मातेचा मृत्यू झाल्याने जिल्हा रुग्णालयात चाललंय काय? असा सवाल उपस्थित होतोय. आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. रुक्मीन परशुराम टोने असे मयत मातेचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रूक्मीन परशुराम टोणे या 13 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा रूग्णालयात ॲडमिट झाल्या होत्या.
त्यानंतर लगेच सकाळी 11:40 वाजता त्यांचे सिझर झाले. त्यांनी 2300 ग्राम वजनाचा मुलाला जन्म दिला. ही त्यांची चौथी प्रसूती होती. त्यांच्यावर आयसीयू विभागात उपचार सुरू होते. आज 14 एप्रिल रोजी सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास त्यांचा उपचार सुरू असतनाच मृत्यू झाला. त्यांचे शवविच्छेदन जिल्हा रूग्णालयात करण्यात आले. रुक्मिणी यांना पूर्वीपासून हृदयाशी संबंधित आजार असल्याचं सांगण्यात आले आहे. तसेच रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना रेफरचा सल्लाही देण्यात आला होता. परंतु ते गेले नाहीत. मात्र सलग दुसऱ्या दिवशी एका मातेचा मृत्यू झाल्याने जिल्हा रुग्णालयात चाललंय काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, रविवारी बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूती दरम्यान मातेचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला. छाया गणेश पांचाळ असे मयत महिलेचे नाव आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. तर प्रसूती व्यवस्थित करण्यासाठी 2 हजारांची मागणी करण्यात आली, असा गंभीर आरोप मयतांच्या नातेवाईकांनी केला. रक्तस्त्राव होत असताना तिथल्या कर्मचाऱ्याला महिला कर्मचाऱ्याला उपचार करा, असे सांगितलं असता आम्ही सर्वजण निघून जातो, तुम्हीच तुमच्या पेशंटवर उपचार करा, असे उत्तर तेथील डॉक्टरांनी दिल्याचे मयताच्या आईने म्हटले आहे. तर मृत महिलेचे पती गणेश पांचाळ यांनी माझ्या बायकोची प्रसुती नॉर्मल झाली. त्यानंतर रक्तस्राव सुरू झाला. कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर आणि नर्स यांनी वेळेवर उपचार केले नाहीत. तसेच रक्ताची पिशवी आणायला उशिरा सांगितले, असा आरोप केला आहे.
Video Player
00:00
00:00