आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार गटाने सर्व 21 जागा मोठ्या फरकाने जिंकत अजित पवार गटाचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा मोठा पराभव केला. जिल्ह्यात एकीकडे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची (APMC) निवडणूक चर्चेत असताना करमाळा तालुक्यात आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीनेही जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. गत निवडणुकीत शरद पवार गटाने करमाळ्यात विधानसभा जिंकल्यानंतर नुकत्याच झालेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूकही मोठ्या फरकाने जिंकली. त्यामुळे, पुन्हा एकदा शरद पवारांच्या पठ्ठ्याने आपली ताकद दाखवून दिली. आज झालेल्या कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीत करमाळ्याचे (Karmala) आमदार नारायण आबा पाटील (Narayan Patil) यांची अध्यक्षपदी तर महेंद्र पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.










