
जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी पर्वतावर दरवर्षी हनुमान जयंतीच्या निमित्ताने मोठया संख्येने भाविक येत असतात. यावर्षी देखील हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. मात्र, हनुमान जयंतीनिमित्त दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर मधमाशांनी आज (शनिवारी) सकाळी आठ वाजेच्या सुमारास हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर मंदिराबाहेरच्या परिसरात एकच गोंधळ उडाल्याचे दिसून आले. तसेच मधमाशांच्या (Bees) या हल्ल्यात ८ ते १० भाविक जखमी झाल्याचे समजते. मंदिरात दर्शनासाठी जात असतांना अचानक मधमाशांनी हल्ला (Attack) केल्यामुळे याठिकाणी काही वेळ भाविकांची पळापळ झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, मधमाशांच्या या हल्ल्यानंतर जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेने अंजनेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. त्यानंतर याठिकाणी डॉ. कुलकर्णी यांच्या देखरेखीखाली जखमींवर उपचार सुरु आहेत. अंजनेरी येथील स्थानिक लोकांच्या म्हणण्यांनुसार गडावरील दरवाजाजवळ मधमाशांनी भाविकांवर हा हल्ला केला.