
जळगावमध्ये एकीकडे चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून यातच जळगाव-सुरत रेल्वे लाइनवर उभ्या मालगाडीच्या दरवाजाचे सील तोडून ७८ हजार रुपये किमतीच्या १२७ खतांच्या गोण्या तीन चोरट्यांनी लांबवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रेल्वेच्या आरपीएफ कार्यालयात गुन्ह्याची नोंद झाली आहे.जळगाव-सुरत रेल्वे लाइनवर उभ्या मालगाडीच्या दरवाजाचे सील तोडून ७८ हजार रुपये किमतीच्या १२७ खतांच्या गोण्या तीन चोरट्यांनी लांबवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रेल्वेच्या आरपीएफ कार्यालयात गुरुवारी गुन्ह्याची नोंद झाली आहे. दरम्यान, रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी मुख्य चोरट्यासह ज्या दोन जणांना खताची विक्री केली, त्यांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून खताच्या ७५ गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत.
पिंपळकोठा येथील योगेश दिलीप बडगुजर याने त्याच्या अन्य दोन साथीदारांच्या मदतीने २६ मार्च रोजी रात्री जळगाव-सुरत लाइनवरील मालगाडीच्या एका डब्याच्या दरवाजाचे सील तोडून खताच्या १२७ गोण्या चोरल्या. बडगुजर याने त्याच्या पिकअप गाडीतून ७५ गोण्या पिंपळकोठा येथे नेल्या. १० गोण्या शेतातील झोपडीत ठेवल्या तर ३० गोण्या विशाल पाटील नामक व्यक्तीला विक्री केल्या. ३५ गोण्या या नातेवाईक लीलाधर बडगुजर याला विक्री केल्या. इतर दोन साथीदार ५७ गोण्या घेऊन पसार झाले.
रेल्वे सुरक्षा दल सुरत रेल्वे लाइनवर गस्त घालत असताना मालगाडीच्या जवळ खत सांडलेले दिसून आले. त्यांनी डब्याची पाहणी केल्यावर त्यातील १२७ १२७ गोण्या चोरी झाल्याचे उघड झाले. योगेश बडगुजर याने त्याचोरल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. चौकशीअंती त्याने चोरीची कबुली देऊन ज्यांना खत विक्री केले त्यांची माहिती दिली. पोलिसांनी विशाल पाटील व लीलाधर बडगुजर यांनाही अटक करून त्यांच्या घरातून व शेतातील झोपडीतून ७५ गोण्या जप्त केल्या. चोरीसाठी मदत करणाऱ्या त्या दोन चोरट्यांचा शोध सुरू आहे. ही कारवाई आरपीएफ ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. उपनिरीक्षक शिवपूजन सिंह, एस. बी. चौधरी, पंकज वाघ, विनोद जेठवे यांनी केली आहे.