
छत्रपती संभाजीनगर येथील बजाजनगरमध्ये पतीने कौटुंबिक वादातून पत्नीच्या गळ्यावर धारदार कात्रीने वार केल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर पतीने घटनास्थळावरून पळ काढलाय. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.बजाजनगर येथे राहणाऱ्या पतीने कौटुंबिक वादातून पत्नीच्या गळ्यावर धारदार कात्रीने वार केले. या घटनेनंतर पत्नी गंभीर जखमी झाली. ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी घडली. कोमल ऋषिकेश खैरे (रा. बजाजनगर, ता. छत्रपती संभाजीनगर) असे जखमी पत्नीचे नाव आहे. या घटनेनंतर पती ऋषिकेश भिकाजी खैरे हा फरार झाला आहे. दोघांचा २०१७ मध्ये विवाह झाला. त्यांना एक पाच वर्षांची मुलगी देखील आहे.
कोमल आणि ऋषिकेश बजाजनगर येथे किराणा दुकान चालवून उदरनिर्वाह करत होते. काही महिन्यांपासून ऋषिकेशला दारूची सवय लागल्याने दोघांत नेहमी वाद होत होता. पत्नी २७ मार्च रोजी नारेगाव येथे माहेरी आली होती. समजावून सांगून दोघे बजाजनगर येथे आले होते. बुधवारी दुपारी कोमलच्या भावाला ती जखमी झाल्याची माहिती मिळाली. कोमलचा भाऊ सचिन डांगरे यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक अरविंद शिंदे हे पुढचा तपास करत आहेत. मात्र, या घटनेने परिसरात मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळाले.