उद्धव ठाकरे हे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये ते शिवसेनेच्या (उबाठा) काही मोजक्या शाखांना भेट देणार आहेत.शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन्ही गटांची ताकद विभागली गेली. त्यात आता तुटपुंजी ताकद उरलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आणखी मोठे धक्के बसायला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या सेनेचा कणा असलेले दोन माजी आमदार देखील ठाकरेंची साथ सोडणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
आधीच ताकद कमी, त्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बसणारे धक्के लक्षात घेता बाळासाहेब ठाकरे यांचं आवडतं शहर असलेल्या पुण्यात शिवसेना (उबाठा) पक्षाला वाचवण्यासाठी स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता मैदानात उतरणार आहेत.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एकीकडे भाजप, आणि आता दुसरीकडून एकनाथ शिंदेंची सेनाही ठाकरेंच्या पक्षांमध्ये नाराज असलेल्या नेत्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. शिंदेंच्या शिवसेनेने तर ‘मिशन टायगर’ राबवत ठाकरेंना अनेक धक्के देण्यास सुरुवात केली आहे.काही दिवसांपूर्वी पुण्यातील शेकडो शिवसैनिकांनी शिंदेंच्या पक्षात प्रवेश केला. आता नाराजांना रोखण्यात ठाकरेंचे स्थानिक नेते कमी पडत असल्याने ही गळती रोखण्यासाठी थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मैदानात उतरणार असल्याचं बोललं जात आहे.आधीच तुटपुंजी असलेली पुण्यातील ठाकरे सेनेची ताकद आणखी कमी होत असल्याने आगामी महापालिका निवडणुकीसाठी ही धोक्याची घंटा होऊ शकते. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी या नाराजांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र नाराज नेत्यांची नाराजी दूर करण्यात कुठेतरी स्थानिक पदाधिकारी कमी पडत असल्याने नुकतंच काही स्थानिक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत पुण्यामध्ये येण्याची विनंती केली होती. त्यानुसार आता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात उद्धव ठाकरे हे पुण्यामध्ये येऊन शाखाप्रमुख यांना भेटणार आहेत.









