थोरगव्हाण येथे माघ शुद्ध पौर्णिमेला ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रोत्सव: मुकुटाची भव्य शोभायात्रा निघणार – पोलिस पाटील अरविंद झोपे यांचे प्रतिपादन थोरगव्हाण (ता. रावेर, जि. जळगाव) येथे ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांचे पुरातन मंदिर असून, हे गावकरी तसेच पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. माघ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 12 फेब्रुवारी 2025 बुधवार रोजी थोरगव्हाण येथे भैरवनाथ महाराजांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा केला जातो. या यात्रोत्सवात विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विशेषतः “श्री भैरवनाथ महाराजांच्या चांदीच्या मुकुटाची भव्य शोभायात्रा ” हा सोहळा भाविकांचे विशेष आकर्षण असतो. या शोभायात्रेत गावातील तसेच परिसरातील हजारो भक्तगण सहभागी होतात. यात्रेची पूर्वतयारी आणि धार्मिक सोहळे यात्रोत्सवाच्या एक दिवस आधी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत थोर सन्मित्र युवा फाऊंडेशन तर्फे वधू-वर परिचय मेळावा आणि समाजातील विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार समारंभ आयोजित केला जातो.
यानंतर ‘देवकाठी उत्सव’ मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या सोहळ्यात परिसरातील गावांमधून आलेल्या विविध देवकाठ्यांची विधिवत पूजा करून त्यांची मिरवणूक काढली जाते. विशेष म्हणजे, तरुण युवक हातावर देवकाठी धरून विविध कसरती करतात, हे रोमांचक दृश्य पाहण्यासाठी भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.मुख्य दिवस – मुकुटाची भव्य शोभायात्रा आणि विशेष पूजनमुख्य यात्रेच्या दिवशी भैरवनाथ महाराजांच्या चांदीच्या मुकुटाची भव्य शोभायात्रा म्हणजेच मिरवणूक ग्रामपंचायत कार्यालयापासून सुरू होते.ही शोभायात्रा ढोल-ताशांच्या गजरात, आकर्षक सजवलेल्या पालखीत आणि भक्तीमय वातावरणात नियोजित मार्गाने पुढे सरकते. संपूर्ण गावात आकर्षक रांगोळया , फुलांच्या पायघड्या टाकून स्वागत केले जाते.यानंतर,भैरवनाथ महाराजांचा मुकुट बाण्यावर विराजमान केला जातो. मंदिर विशेष प्रकारे सजवले जाते, आणि संध्याकाळी विशेष पूजा व महाआरती आयोजित केली जाते. आरतीनंतर भाविक रांगेत उभे राहून दर्शन घेतात व आपल्या श्रद्धेची निवेदने करतात.अनुष्ठान आणि नवस फेडण्याच्या परंपरा
यात्रोत्सवात श्रद्धाळू भाविक आपले नवस फेडण्यासाठी विविध धार्मिक विधी करतात. यामध्ये नैवेद्य अर्पण करणे, नवसाचे दागिने चढवणे, मिष्ठान्न दान करणे आणि विविध धार्मिक अनुष्ठाने पार पाडणे यांचा समावेश असतो.‘तोडर उपडणे’ हा या यात्रेतील सर्वाधिक रोमहर्षक आणि उत्साहपूर्ण सोहळा मानला जातो. या अनोख्या परंपरेत नवयुवक लोखंडी सूड ओढून काढतात, हे पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळते.यात्रेचे सुरक्षित आणि शिस्तबद्ध आयोजनगावाचे पोलीस पाटील अरविंद झोपे यात्रेच्या संपूर्ण व्यवस्थेवर विशेष लक्ष ठेवतात. शोभायात्रा, देवकाठी मिरवणूक, आरती आणि इतर धार्मिक विधी सुयोग्य पद्धतीने पार पडावेत यासाठी ग्रामस्थ, स्वयंसेवक आणि पोलीस प्रशासन सहकार्य करते.याशिवाय, बारा बलुतेदार, ग्रामस्थ मंडळे आणि विविध सामाजिक संघटनांचा सक्रिय सहभाग यात्रेच्या यशस्वी आयोजनात मोलाचा वाटा उचलतो.सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व
थोरगव्हाण येथील भैरवनाथ महाराज यात्रोत्सव हा धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. शेकडो वर्षाची परंपरा यात्रोत्सवाला लाभली आहे .गावातील मूळ रहिवासी नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणाच्या निमित्ताने मोठ्या शहरांत स्थायिक झाले असले, तरी या पवित्र यात्रेला उपस्थित राहण्यासाठी ते खास नियोजन करतात.भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा संगमश्रमप्रतिष्ठा, श्रद्धा, भक्ती आणि कृषी संस्कृतीचा आधारवड असलेल्या भैरवनाथ महाराजांच्या यात्रेच्या आगमनाची आतुरता संपूर्ण गावभर जाणवत आहे.यात्रोत्सवाच्या निमित्ताने गावातील वातावरण भक्तीमय आणि उत्साहपूर्ण बनते. परंपरांचा सन्मान राखत, भाविक आणि ग्रामस्थ या यात्रेत संपूर्ण मनोभावे सहभागी होतात.यात्रोत्सवाच्या निमित्ताने गावातील वातावरण भक्तीमय आणि उत्साहपूर्ण बनते. परंपरांचा सन्मान राखत, भाविक आणि ग्रामस्थ या यात्रेत संपूर्ण मनोभावे सहभागी होतात.









