लेकीने आंतरधर्मीय विवाह केला. पण, कुटुंबाला ते काही मान्य झालं नाही. तीन वर्षांनी मुलगी घरी आली तेव्हा घरच्यांनी तिच्या नवऱ्याला हाकलून लावलं आणि मुलीला साखळदंडाने बांधून ठेवलं.पायात साखळदंड बांधून दोन महिने घरात कोंडून ठेवलेल्या विवाहितेची भोकरदन पोलिसांनी शहरालगतच्या आलापुर भागातून सुटका केली आहे. तिला छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या खंडपीठ मार्फत तिच्या पतीच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.भोकरदन शहरालगत असलेल्या आलापुर येथील खालिद शहा सिकंदर शहा यांची मुलगी शहनाज उर्फ सोनल ही छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या कुटुंबासोबत राहत होती. मिसाळवाडीमध्ये राहत असताना तेथील सागर संजय ढगे या मुलासोबत तिने आंतरधर्मीय विवाह केला. यानंतर शहा कुटुंबीय आलापुर येथे परत आपल्या मूळ गावी आले. या विवाह संबंधातून शहनाजला तीन वर्षाचा कार्तिक नावाचा मुलगाही आहे.










