महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार झाला, त्यानंतर खातेवाटप देखील करण्यात आले. गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री म्हणून जाहीर झाल्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी बघायला मिळाली. त्यानंतर आता या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. आता शिवसेनेच्या नेत्याकडून मोठा दावा हा करण्यात आलाय.महायुतीला लोकांनी प्रचंड असे बहुमत दिल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार नागपूरमध्ये करण्यात आला. या मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आणि खातेवाटपही झाले. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये एकमत होत नसल्याचे बघायला मिळाले. पालकमंत्र्यांची घोषणा अखेर करण्यात आली. मात्र, त्यानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली.










