गोरखपूरमध्ये भाभा संशोधन संस्थेचे सहाय्यक शास्त्रज्ञ राममिलन यांच्या पत्नीचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता. पोलीस तपासातून या हत्येचे गूढ उकलले आहे. उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमध्ये एक खळबळजनक घटना घडली होती. भाभा संशोधन संस्थेचे सहाय्यक शास्त्रज्ञ राममिलन यांच्या पत्नीचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता. राममिलन यांची पत्नी आपल्या अल्पवयीन मुलासोबत राहत होती. डोक्यात गंभीर जखम झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा संशय होता. आपली पत्नी फोन उचलत नसल्याने शास्त्रज्ञ राममिलन यांनी घराकडे धाव घेतली. त्यांनी घरात पाय ठेवताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना आपली पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. यानंतर तात्काळ पोलिसांना कळवण्यात आले. पोलीस तपासातून या हत्येचे गूढ उकलले आहे.
अल्पवयीन मुलानेच आपल्या आईला मारुन टाकल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. या संपूर्ण प्रकाराचे एकच कारण ते म्हणजे आईने मुलाला शाळेत जाण्यासाठी उठवले. रागाच्या भरात त्या मुलाने आपल्या आईला धक्काबुक्की केली आणि नंतर तिचे डोकं भिंतीवर आदळलं, ज्यात ती गंभीर जखमी झाली. एवढं सारं घडल्यानंतरही मुलाने तिला दवाखान्यात घेऊन न जाता तशाच स्थितीत सोडून शाळेत गेला होता. दरम्यान अतिरक्तस्रावामुळे आईचा जागीच मृत्यू झाला.










