वाघ यांचा खून सुपारी देऊन केला असण्याची दाट शक्यता पोलिस व्यक्त करीत आहेत. दरम्यान, दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, खुनामागील उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. मामा सतीश वाघ यांच्या खून प्रकरणी विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी मंगळवारी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘पोलिस यंत्रणा सक्षमपणे तपास करीत असून, यंत्रणेवर माझा विश्वास आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे फोन आले असून, तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत, असे त्यांनी सांगितले.’ विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा अपहरणानंतर धावत्या गाडीतच त्यांचा खून केला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. वाघ यांचे अपहरण व खून या घटना अवघ्या तासाच्या आत घडल्याचे समोर आले आहे. सकाळी साडेसहाला अपहरण झाले आणि ती कार मृतदेह टाकून सकाळी साडेसातला परत उरुळी कांचनमध्ये आल्याचे ‘सीसीटीव्ही’ फुटेजवरून स्पष्ट झाले आहे.










