गणेशोत्सवासंबंधी सर्व घटक एकत्र जोडले जावेत, पर्यटन वाढावे, आपल्या समृद्ध परंपरा रितीरिवाजांचे जतन-संवर्धन व्हावे आणि महाराष्ट्राचे स्थान जगाच्या नकाशावर आधारित व्हावे यासाठी गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरवले आहे.राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा जाहीर केला आहे. या गणेशोत्सवात सरकार थेट सहभागी होणार असून हा महोत्सव राष्ट्रीय, आतंरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. तर, गणेशोत्सवात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषाही त्यांनी जाहीर केली.
यासंदर्भातील निवेदन करताना शेलार म्हणाले की, शेकडो वर्षांची घरगुती गणेशोत्सव परंपरा व अनेक वर्षापासूनची सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक समरसतेचे मानबिंदूच आहेत. याच मानबिंदूचे महत्त्व व ओळख संपूर्ण जगभर व्हावी, आपल्या परंपरेची आधुनिकतेशी सांगड व्हावी सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे असणारे गणेशोत्सव हे व्यासपीठ आणखी बळकट व्हावे, गणेशोत्सवासंबंधी सर्व घटक एकत्र जोडले जावेत, पर्यटन वाढावे, आपल्या समृद्ध परंपरा रितीरिवाजांचे जतन-संवर्धन व्हावे आणि महाराष्ट्राचे स्थान जगाच्या नकाशावर आधारित व्हावे यासाठी गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरवले आहे.









