दौंड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू असणारे रमेश थोरात हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याच्या राजकारणात सध्या नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. काँग्रेसशी एकनिष्ठ असणारे थोपटे कुटुंब काही महिन्यांपूर्वी भाजपवासी झाले. त्यानंतर काँग्रेसमध्ये हयात गेलेले संजय जगताप यांनीसुद्धा काल परवाच भाजपचं कमळ हाती घेतलं. तर इंदापूरमध्ये सुद्धा प्रवीण माने यांच्या रुपाने भाजपाने आपली ताकद वाढवली. एकीकडे भोर, पुरंदर आणि इंदापूर या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपने एकामागोमाग एक चाली खेळत आपली ताकद वाढवली आहे. तर, आता दुसरीकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे अजित पवार हेसुद्धा आता यामध्ये उतरले असून त्यांनी आपलं लक्ष दौंड तालुक्याकडे वळवलं आहे. दौंडमध्ये येत्या काही दिवसात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे, आणि या राजकीय भूकंपाचा सर्वात मोठा धक्का अजित पवार हे आपले काका शरद पवार यांनाच देणार आहेत.
दौंड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू असणारे रमेश थोरात हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. या प्रवेशासंदर्भात आपल्या कार्यकर्त्यांसोबत खाजगीमध्ये रमेश थोरात यांच्या बैठका सुरू असल्याची माहिती आहे. येत्या काही दिवसांमध्ये दौंड तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी एक मोठा मेळावा घेत अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पाडण्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.दौंड तालुक्यामध्ये कुल विरुद्ध थोरात असा मोठा संघर्ष नेहमीच पाहायला मिळाला आहे. मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत राहणं पसंत केलं. त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये रमेश थोरात यांनी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यासोबत मिळून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला. मात्र विधानसभा निवडणूक जाहीर होताच रमेश थोरात यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना साथ देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत राहुल कुल यांनी त्यांचा पराभव केला.आता येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. यामध्ये पुणे जिल्हा परिषदेची देखील निवडणूक होणार आहे.









