उद्धव ठाकरेंना विदर्भात मोठा धक्का बसणार आहे. उबाठाचे जिल्हाध्यक्ष पक्षाला जय महाराष्ट्र करत लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) मोठे यश मिळवले होते. तर भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीला (Mahayuti) पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र महायुतीने महाविकास आघाडीचा जोरदार पराभव केला. या पराभवानंतर महाविकास आघाडीतून अनेक लोकप्रतिनिधी आपापल्या पक्षांना रामराम ठोकत महायुतीच्या दिशेने वळत आहेत. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) एकामागे एक धक्के गेल्या काही दिवसांपासून बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रपूरचे (Chandrapur) जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे (Ravindra Shinde) हे पक्षाला जय महाराष्ट्र करून लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.










