तेलंगणा राज्यातील करिया बिच्चप्पा हा मजूर कल्याणमधील एका इमारतीवरुन पडून मृत्यूमुखी पडला. त्याच्या मृतदेहावर कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाबाहेर खासगी रुग्णवाहिका (Ambulance) चालकांनी केलेल्या दादागिरीमुळे एका मजुराचा मृतदेह तब्बल तीन तास शवागृहात पडून राहिल्याची बाब समोर आली आहे. भाडे कमी देण्याचा प्रयत्न करीत असलेल्या दुसऱ्या रुग्णवाहिका चालकाला थेट अडवण्यात आले. या प्रकारामुळे माणुसकीचाच जणू मृत्यच झालाय अशी चर्चा रुग्णालय (Hospital) परिसरात रंगली होती. विशेष म्हणजे या प्रकारामुळे मृतदेहाची देखील विटंबना झाल्याचे काहींनी म्हटले आहे. दरम्यान, केडीएमसी रुग्णालयाबाहेर हा प्रकार घडत असल्याने केडीएमसी (KDMC) प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी काय करतात? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.










