शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदाचा चेहरा हा पश्चिम महाराष्ट्रातूनच देण्यात आला आहे. या आधी जयंत पाटलांनी ही जबाबदारी जवळपास आठ वर्षे सांभाळली होती. शरद पवारांनी भाकरी फिरवली असून शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जयंत पाटलांच्या राजीनाम्यानंतर आता पक्षाचा धुरा शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. शशिकांत शिंदे यांची निवड ही एकमताने करण्यात आली आहे. शशिकांत शिंदे हे शरद पवारांचे विश्वासू नेते मानले जातात. त्यामुळे त्यांना ही संधी मिळाल्याची चर्चा आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मंगळवारी महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये नव्या प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली. मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली.










