पुण्यात आमदार गोपीचंद पडळकर यांनी फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील दुकानांमध्ये ‘लव्ह जिहाद’ सुरू असल्याचा आरोप केला. या आरोपांना एफसी रोड व्यापारी संघटनेने विरोध दर्शवला आहे. संघटनेचे अध्यक्ष शाम मारणे यांनी सांगितले की, अशा कोणत्याही घटना त्यांच्या निदर्शनास आलेल्या नाहीत. पडळकरांनी आरोप सिद्ध करावे, असे आव्हान व्यापाऱ्यांनी दिले आहे. पुण्यामध्ये 2 दिवसांपूर्वी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हिंदू जन आक्रोश मेळावा आयोजित केला होता. सांगली जिल्ह्यातील विवाहिता ऋतुजा राजगे यांच्यावर धर्मांतराचा दबाव असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा पडळकर यांनी केला असून त्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये गोपीचंद पडळकर यांनी पुण्यातील महत्त्वाच्या असणाऱ्या फर्ग्यूसन कॉलेज रोडवरील स्ट्रीट शॉपिंग मार्केटमध्ये लव्ह जिहादसारखे प्रकार सुरू असल्याचा धक्कादायक आरोप केला होता.मात्र, गोपीचंद पडळकर यांचा हा दावा एफसी रोडवरील व्यापाऱ्यांनी खोडून काढला आहे.
एफसी रोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शाम मारणे यांनी गोपीचंद पडळकरांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “असे कोणतेही प्रकार घडल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं नाही. आम्ही ‘ लव्ह जिहाद ‘सारख्या प्रकारास कोणतीही थारा देणार नाही. जर कोणती व्यक्ती मुलींना आमिष दाखवून फसवत असतील, तर तो प्रकार निंदनीय आहे. मात्र अशा कोणत्याही घटना आमच्या माहितीप्रमाणे घडलेल्या नाहीत. जर खरोखरच असे काही घडले असते, तर माध्यमांमध्ये ते गाजले असते आणि पोलिसांकडेही त्याची नोंद असती. परंतु पोलिसांकडे अशा स्वरूपाची कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही,” असे शाम मारणे म्हणाले आहेत. तर, पडळकर जे म्हणतात तसा प्रकार घडत असेल तर त्यांनी तो थेट आमच्या निदर्शनास आणावा. आम्ही नक्कीच खबरदारी घेऊ. याआधीही एफसी रोड परिसरात बांगलादेशी किंवा रोहिंग्या नागरिकांच्या वावराबाबत आरोप झाले होते, मात्र पोलीस तपासात हे आरोप निराधार ठरले होते, असे देखील मारणे म्हणाले आहेत.दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही याठिकाणी प्रामाणिकपणे व्यापार करत आहोत.









