जळगाव: महिलांच्या सक्षमीकरणाचा व आत्मनिर्भरतेचा दीपस्तंभ ठरणाऱ्या ऐतिहासिक उपक्रमात चोपडा शहरातील योगिता ताई या पहिल्या महिला पिंक ऑटो रिक्षा चालक-मालक ठरल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात त्यांना पिंक रिक्षा प्रदान करण्यात आली. या अनोख्या उपक्रमासाठी रोटरी क्लब जळगाव व मराठी प्रतिष्ठान यांचे विशेष सहकार्य लाभले. महिला सबलीकरण आणि उद्यमशीलता यांचे सशक्त उदाहरण ठरलेला हा उपक्रम मराठी प्रतिष्ठानतर्फे गेल्या पाच वर्षांपासून यशस्वीपणे राबविला जात आहे. महिलांना पिंक रिक्षा चालविण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देणे, उद्योजक व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून डाऊन पेमेंट उपलब्ध करून देणे आणि महिलांना रिक्षा मालक बनविणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.










