सोलापूर जिल्ह्यात आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेल्या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुरेश पाटील आणि शिवाजी दळवी, अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे उजनी गावावर शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.सोलापूर जिल्ह्यात आषाढी एकादशीच्या दिवशी एक दुःखद घटना घडली आहे. पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेल्या दोन तरुणांचा ST बसच्या अपघातात मृत्यू झाला. सुरेश बाळासाहेब पाटील (वय 23) आणि शिवाजी बापूसाहेब दळवी (वय 21, दोघे रा. उजनी, ता. माढा) अशी त्यांची नावे आहेत. 6 जुलै रोजी रात्री 9:50 च्या सुमारास कुर्डुवाडी-पंढरपूर रस्त्यावर लऊळ गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या त्यांच्या दुचाकीने ST बसला समोरून धडक दिली.
आषाढी एकादशीनिमित्त अनेक भाविक पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात होते. त्याचप्रमाणे सुरेश आणि शिवाजी हे दोघे तरुणही दुचाकीवरून पंढरपूरला निघाले होते. MH-20 BL-3173 नंबरची जालना-पंढरपूर जाणारी ST बस कुर्डुवाडी-पंढरपूर रोडवर आली. त्यावेळी MH-45 AR-6536 नंबरच्या दुचाकीने बसला जोरदार धडक दिली.अपघाताची तीव्रता इतकी जास्त होती की, दुचाकीवरील दोघेही तरुण रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते जागीच बेशुद्ध झाले. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. जमाव मारहाण करेल या भीतीने बस चालक रमेश पांडुरंग पाटील आणि वाहक सुनील सुरेश पाटील यांनी थेट कुर्डुवाडी पोलीस स्टेशन गाठले.









