शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल आणि महानगरप्रमुख मामा राजवाडे यांच्यासह पाच माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला नाशिकमध्ये पुन्हा एकदा धक्का बसला आहे. सुधाकर बडगुजर, विलास शिंदे यांच्यानंतर आणखी एका बड्या नेत्याने शिवबंधन सोडले आहे. विशेष म्हणजे चारच दिवसांपूर्वी ठाकरेंनी ज्यांच्यावर महानगर प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली, त्या मामा राजवाडे यांनीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना झटका दिला आहे. ते भाजपचा झेंडा खांद्यावर घेणार आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल आणि महानगरप्रमुख मामा राजवाडे यांच्यासह पाच माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांच्यासह कमलेश बोडके, प्रशांत दिवे, सचिन मराठे, सीमा ताजने यांचा आज भाजपात प्रवेश होणार आहे.याआधी, तत्कालीन महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या शिवसेना प्रवेशाची कुणकुण लागताच गेल्या आठवड्यात शुक्रवारीच मामा राजवाडे यांची त्याजागी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे.दरम्यान, सध्या चार नगरसेवक आमच्यासोबत आहेत, असा दावा ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख डी जी सुर्यवंशी यांनी केला आहे.









