मुंबईत एका टेलिव्हिजन अभिनेत्रीच्या मुलाने टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपवलं. कांदिवली परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.मुंबई: मुंबईमध्ये एका प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीच्या मुलाने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली परिसरात बुधवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मुलाला ट्युशनला जाण्यास सांगितल्याने दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातून मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. 57 व्या मजल्यावरुन उडी मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार, मुंबईच्या पश्चिम उपनगरात ही घटना घडली असून अभिनेत्री कांदिवली परिसरातील सी ब्रुक येथे वास्तव्यास होती. ती टेलिव्हिजनवरील गुजराती मालिकांमध्ये काम करते. अभिनेत्रीने आपल्या मुलाला ट्युशनला जाण्यास सांगितले. मात्र, त्याला क्लासला जायचे नव्हते. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे मुलगा संतापला होता. याच संतापाच्या भरात मुलाने इमारतीच्या 57 व्या मजल्यावर जाऊन खाली उडी टाकली. 57 व्या मजल्यावरुन थेट खाली पडल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला. आत्महत्या करणारा मुलगा या दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे कांदिवली परिसरात एकच खळबळ उडाली आहे.प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, मुलाने उडी मारल्यानंतर मोठा आवाज झाला.









