दोन महिन्यांपूर्वी लग्न, सुखाच्या संसाराला सुरुवातच झाली होती. पण, पतीच्या लालसेने सर्व संपवलं. लग्नाच्या दोन महिन्यातच एका नवविवाहितेने आपल्या आयुष्याची अखेर केली.एका नवविवाहितेने लग्नाच्या दोन महिन्यातच आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. तिचा पती हुंड्यासाठी तिचा छळ करत असल्याचा आरोप आहे. तेलंगणामध्ये कुकटपल्ली हाउसिंग बोर्ड (केपीएचबी) कॉलनीमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे. दोन महिन्यांपूर्वीच या नवविवाहितेचा विवाह झाला होता आणि पतीच्या सततच्या त्रासामुळे तिने हे पाऊल उचलल्याची माहिती आहे. पोलिसांनी पती आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, मृत नवविवाहितेचे नाव पूजिता असून ती खम्मम जिल्ह्यातील रहिवासी होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजिताचा पती श्रीनिवास कुकटपल्ली हाउसिंग बोर्ड (केपीएचबी) कॉलनीमध्ये एका सोन्याच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करतो. 16 एप्रिल रोजी पूजिता आणि श्रीनिवास यांचा विवाह झाला होता. सुरुवातीला श्रीनिवासने पूजिताशी चांगले वर्तन केले, परंतु काही दिवसांनंतर त्याने तिला अतिरिक्त हुंडा आणण्यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली.हुंड्याच्या मागणीसाठी तो पूजिताला सतत मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. पतीच्या सततच्या जाचाला कंटाळून पूजिताने घरात गळफास लावून आपले जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.पूजिताच्या कुटुंबीयांनी श्रीनिवास आणि त्याच्या कुटुंबाला सांगितले होते की, ते पीक कापणीनंतर 10 लाख रुपये देतील. तरीही त्यांनी पूजिताला त्रास देणे थांबवले नाही. पोलिसांनी या प्रकरणी श्रीनिवास आणि त्याच्या कुटुंबातील अन्य सहा सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. दोन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या नवविवाहितेने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी पूजिताच्या कुटुंबीयांनी केली आहे.









