नोकरदार सर्वसामान्य लोक आपल्या आयुष्यभराची कमाई वाचवून घर घ्यायचं स्वप्न पूर्ण करतात. काही कर्ज घेतात तर काही घरासाठी प्रत्येक पैसे वाचवतात पण, सुभाष बिजाराणी आणि रणवीर बिजाराणी सारखे लोक त्या स्वप्नांना धुळीस मिळवतात. राजस्थानमधील दोन भावांनी स्मार्ट सिटीच्या नावाखाली 70 हजार लोकांना 2676 कोटी रुपयांची फसवणूक करून सर्वात मोठा रिअल इस्टेट घोटाळा केला आहे.राजस्थानमधून 2,676 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा एक प्रकार समोर आला आहे. एवढी मोठी फसवणूक करण्यासाठी दोन भावांनी बनावट कंपनी उभी केली आणि सुमारे 70000 लोकांना जाळ्यात अडकवले. सुभाष बिजाराणी आणि रणवीर बिजाराणी या दोन भावांनी कोणत्याही अडथळ्याशिवाय एवढी मोठी फसवणूक केली. या दोघांनी नेक्सा एव्हरग्रीन नावाची कंपनी स्थापन केली आणि गुजरातमधील ‘धोलेरा स्मार्ट सिटी’मध्ये उच्च परतावा आणि जमिनीचे भूखंड देण्याचे आश्वासन देऊन गुंतवणूकदारांना फसवल्याचा आरोप करण्यात आला आहे.










