शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी भाजप नेते नितेश राणे यांच्यावरही निशाणा साधला.मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन सोहळा गुरुवारी षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी बोलताना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. तसंच ठाकरे यांनी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनाही आक्रमक शब्दांत लक्ष्य केलं. “सध्या हिंदू-मुस्लीम यांच्यात भांडण लावले जात असून भाजपच्या एका बेडकाकडे तेवढेच काम दिले आहे. परंतु तुझी उंची केवढी, तुझा आवाज कसा? उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा आहे. डोळे कोणासारखे आहेत हे माहिती नाही,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी नितेश राणे यांचे नाव न घेता लगावला.
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केली. परंतु तुम्ही शेटजींची पालखी वाहण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली असा आरोप करत शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही नाव न घेता टीका केली.’भाजपही असाच आहे, ज्या सरदार पटेल यांनी संघावर बंदी आणली होती त्याच पटेलांचा जगातील सर्वांत मोठा पुतळा बांधण्याची वेळ यांच्यावर आली. हे यांचे कर्तृत्व आणि आपल्याला शिकवतात हिंदुत्व’, असेही ते म्हणाले. ‘तुम्ही सैन्याचे पाय बांधले नसते तर आपण पाकिस्तान घेतलाच असता. परंतु ट्रम्पचा फोन आल्यावर तुमचा आवाजच गेला. चार अतिरेकी आलेच कसे? अतिरेकी गेले कुठे? पाताळात गेले, आकाशात गेले की भाजपमध्ये गेले?’, असा प्रश्नही त्यांनी केला.”केंद्रात सरकार आल्यापासून पनवती लागली आहे. विविध अपघातांमध्ये लोक मरत असताना ते कशाचीच जवाबदारी घेत नाहीत. आज देशाला पंतप्रधानाची गरज असताना ते केवळ भाजपचे आहेत. देशाला गृहमंत्र्यांची गरज आहे, घरफोड्या अमित शहांची नाही.









