ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे महायुती सावध झाली आहे.मुंबई: ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरु असताना महायुतीच्या गोटातून महत्त्वाची बातमी येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे ब्रँड धोक्यात आलेला आहे. त्यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही लागण्याची शक्यता आहे. ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी दोन्ही बंधू सोबत येऊ शकतात. तशी चर्चा गेल्या दीड महिन्यांपासून सुरु आहे. त्यामुळे मुंबईत ठाकरेंचा मुकाबला करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कंबर कसली आहे.
मुंबई महापालिकेवरील वर्चस्व कायम राखण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. विधानसभा निवडणुकीत दणका बसल्यानंतर उद्धव यांनी राज यांच्यासोबत जुळवून घेण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही बंधूंनी मनोमिलनाच्या दृष्टीनं सकारात्मक विधानं केलेली आहेत. त्यामुळे मुंबईत शिवसेना उबाठा आणि मनसे यांच्या युतीची शक्यता वाढली आहे. ही घडामोड पाहता महायुतीनं त्यांना टक्कर देण्यासाठी रणनीती आखली आहे.ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्याचा सर्वाधिक परिणाम मुंबईत दिसू शकतो. त्यामुळे महायुती मुंबई महापालिकेत सोबत लढण्याची शक्यता आहे. तशा हालचाली महायुतीच्या गोटात सुरु झालेल्या आहेत. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतदारांमध्ये भावनिक लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत महायुतीमधील तिन्ही पक्ष सोबत आल्यास मराठी, उत्तर भारतीय मतांचं विभाजन होऊ शकतं.









