सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पुण्यातील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ज्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. हे सर्व स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघाले होते, तेव्हा त्यांच्या बसला ट्रकने धडक दिली. या दुर्घटनेत आठ जण जखमी झाले असून त्यांच्यावर सोलापुरात उपचार सुरू आहेत.सोलापूर: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात पुण्यातील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये पुणे शहर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. हे सर्व प्रवासी स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघाले होते. त्यांच्या बसला एका ट्रकने धडक दिली. या अपघातात आठ जण जखमी झाले असून त्यांच्यावर सोलापुरात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी, १० जून रोजी दुपारी घडली.
पुणे शहर पोलीस दलातील कर्मचारी आणि प्रवासाचे नियोजन करणारे अशा दोघांचा अपघातात मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये गौरीशंकर कुलकर्णी (वय ५१, रा. पुणे) आणि आकाश मुकेश जाधव (वय ३२, रा. पुणे) यांचा समावेश आहे. हे सर्व लोक पुण्याहून अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघाले होते.मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर वळसंग टोलनाक्याजवळ हा अपघात झाला. पुण्यातील आर्या ट्रॅव्हल्स (MH12 VT1172) या बसने समोर उभ्या असलेल्या मालट्रकला (MH12 SF3455) जोरदार धडक दिली.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावर, पोलिस निरीक्षक राजेंद्र टाकणे, पोलिस निरीक्षक महेश स्वामी आणि त्यांच्या टीमने घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी वाहतूक कोंडी सुरळीत केली.









