कोल्हापुरात एका युवतीचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. समीक्षा नरसिंगे नावाच्या 23 वर्षीय तरुणीची हत्या झाली. ती सतिश यादव नावाच्या व्यक्तीसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या. लिव्ह- इन- रिलेशनशिपमध्ये राहून देखील लग्नाला नकार देणाऱ्या युवतीच्या छातीत धारधार शस्त्राने भोसकून अमानुषपणे खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेने कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना करवीर तालुक्यातील सरसोबतवाडी येथे घडली असून समीक्षा भारत नरसिंगे उर्फ बागडी (वय 23, रा. जयभवानी गल्ली) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे तर संशयित आरोपी सतिश मारूती यादव ( वय 25, रा. शिवाजीपेठ, कोल्हापूर) हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील कसबा बावडा येथील जय भवानी गल्ली परिसरात मयत समीक्षा ही आपली आई आणि लहान बहीण भावासोबत राहत होती. 2018 साली समीक्षाच लग्न लक्षतीर्थ वसाहत परिसरातील मुलासोबत झालं होतं. मात्र लग्नानंतर तीन महिन्यात नवऱ्याशी पटत नसल्याने नवऱ्याला सोडून ती आपल्या आई, बहीण, भावासोबत कसबा बावड्यातील जय भवानी गल्ली येथे राहत होती. तर ती गेल्या काही वर्षापासून इव्हेंट मॅनेजमेंटच काम करत होती. याच वेळी एका इव्हेंट च्या माध्यमातून तिची ओळख तेलंगणा येथून कोल्हापुरात कामानिमित्त आलेली तरुणी आयशू आंपले आणि संशयित कोल्हापुरातील शिवाजी पेठ येथे राहणारा सतिश यादव या दोघांशी झाली.











