जिल्हा बँक आणि गोकुळच्या अध्यक्षपदामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांच्या घरात दोन्ही महत्त्वाची जिल्ह्यातील सत्ताकेंद्रे गेली आहेत. या दोन्ही केंद्रांवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा थेट संदर्भ आहे.आमदारकी नको, पण गोकुळचे (Gokul Chairman Election) संचालक करा अशी एक म्हण कोल्हापूरच्या (Kolhapur Politics) राजकारणामध्ये चांगलीच प्रचलित आहे. यावरून गोकुळमधील संचालकपद आणि गोकुळचे अध्यक्षपद किती ताकदीचे आणि महत्त्वपूर्ण आहे याचा अंदाज घेण्यासाठी पुरेसं आहे. गेल्या काही दिवसांपासून गोकुळ अध्यक्ष निवडीमुळे गोकुळचे राजकारण ढवळून निघालं. पहिल्या दोन वर्षात विश्वास पाटील यांना संधी दिल्यानंतर गेल्या दोन वर्षामध्ये अरुण डोंगळे यांनी गोकुळच्या अध्यक्षपदाचा कारभार पाहिला. मात्र, त्यांनी जेव्हा त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आणि स्वत:हून राजीनामा देण्याची वेळ आली तेव्हा नेहमीप्रमाणे त्यांनी दगाबाजी करत राजीनामा देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा झाला पाहिजे, असे म्हणत गोकुळच्या स्थानिक पातळीवरील राजकारणाला राज्यपातळीवर नेण्याचा प्रयत्न केला आणि यामध्येच राजकीय संघर्ष सुरू झाला. मात्र, गोकुळच्या संचालकांनी निर्धार करत अध्यक्ष निवडीचे सर्वाधिकार राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या नेत्यांना दिले. त्यामुळे अरुण डोंगळे यांचा बंडाचा परिणाम झाला नाही. मात्र, अध्यक्ष कोण होणार? यावर सस्पेन्स कायम होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा थेट हस्तक्षेप अध्यक्षपदासाठी राजश्री शाहू शेतकरी आघाडीकडून सर्वसामान्य चेहरा देण्यासाठी प्रयत्न सुरू होते आणि यामधूनच गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील, किसन चौगुले, अजित नरके यांच्या नावाची चर्चा रंगली होती. त्यामध्येही शशिकांत पाटील यांचं नाव आघाडीवर होतं. मात्र, गोकुळ अध्यक्ष निवडीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis on Gokul) यांनी गोकुळच्या राजकारणामध्ये थेट हस्तक्षेप करत कोणत्याही स्थितीत गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा झाला पाहिजे, असा शब्द देत नेत्यांना पेचात टाकले.










