अभियंत्याशी संबंधित अनेक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. त्याच्या दोन निवासस्थानांमध्ये तब्बल 2 कोटींपेक्षा अधिक रोख रक्कम आढळली आहे.ओडिशात भ्रष्टाचाराचं आणखी एक धक्कादायक प्रकरण उजेडात आलं आहे. ओडिशाच्या दक्षता विभागाने छापा टाकण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पाहून एका वरिष्ठ अभियंत्यानं घाबरून खिडकीतून नोटांचे बंडलं खाली फेकले. या अभियंत्याशी संबंधित अनेक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. त्याच्या दोन निवासस्थानांमध्ये तब्बल 2 कोटींपेक्षा अधिक रोख रक्कम आढळली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड असल्यामुळे, ती मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना नोटा मोजण्याची यंत्रे आणावी लागली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.ओडिशाच्या दक्षता विभागाने शुक्रवारी भुवनेश्वर आणि अंगुल येथे छापे टाकले. या कारवाईदरम्यान एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरातून 2.1 कोटींपेक्षा अधिक रोकड जप्त करण्यात आली. भुवनेश्वर रोडवेज विभागाचे मुख्य अभियंता बैकुंठनाथ सारंगी यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर एकाच वेळी धाडसत्र राबवण्यात आले. भुवनेश्वरमधील पीडीएन एक्झॉटिका इमारतीतील त्यांच्या फ्लॅटमध्ये 1 कोटी रुपये सापडले, तर अंगुलमधील दुसऱ्या फ्लॅटमध्ये 1.1 कोटी रुपये आढळून आले. खिडकीतून नोटांचा पाऊस अन्… दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांना पाहताच, बैकुंठनाथ सारंगी यांनी त्यांच्या फ्लॅटच्या खिडकीतून 500 रुपयांच्या नोटांची बंडलं खाली फेकली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, खिडकीतून फेकलेल्या या नोटा दक्षता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतल्या.










