पाकिस्तानला लागून असलेल्या ४ राज्यांमध्ये उद्या मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. तसे आदेश या राज्यांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे सीमावर्ती भागांमध्ये उद्या हालचालींना वेग आलेला असेल.नवी दिल्ली: भारत-पाकिस्तान सीमेवरील ४ राज्यांमध्ये पुन्हा एकदा मॉक ड्रिल होणार आहे. त्याबद्दलचे आदेश देण्यात आलेले आहेत. गुजरात, पंजाब, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्ये उद्या म्हणजेच २९ मे रोजी सुरक्षा मॉक ड्रिल करण्यात येईल. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताकडून पहिल्यांदाच मॉक ड्रिल करण्यात येत आहे. ऑपरेशन सिंदूर ६ आणि मेच्या रात्री करण्यात आलं. या ऑपरेशनच्या अंतर्गत भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.ऑपरेशन सिंदूरच्या आधी केंद्र सरकारनं देशव्यापी मॉक ड्रिलचे आदेश दिले होते. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचे संबंध ताणले गेलेले असताना ७ मे रोजी देशातील २४४ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिलची घोषणा करण्यात आली होती. पण ६ आणि ७ मेच्या रात्रीच भारतीय सैन्यानं पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा मॉक ड्रिलची घोषणा झाल्यानं पुन्हा काहीतरी मोठी कारवाई होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तशा चर्चांना उधाण आलेलं आहे.










