राजधानी मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची (Mumbai) दाणादाण उडवली होती. मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. शहरातील भुयारी मेट्रो स्टेशनमध्ये पाणीच पाणी झाल्याने काही दिवसांपूर्वीच उद्घाटन झालेल्या मेट्रोचे स्थानकाचे धिंदवडे निघाले होते. त्यानंतर, शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मेट्रो स्टेशनची पाहणी केल्यानंतर भाजप आणि महायुती सरकारवर थेट निशाणा साधला. तर, आज पत्रकार परिषदेतून पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केलं आहे. नगरसेवकांना फोडण्यासाठी वापरला जाणारा पैसा हा मुंबईकरांचे आज जे हाल झाले त्यातून काढलेला असल्याचे आदित्य यांनी म्हटले होते. तसेच, केंद्रातील भाजप नेत्यांवरही आदित्य यांनी हल्लाबोल केला. त्यावरुन, आता माजी मंत्री आणि खासदार नारायण राणे (Narayan rane) यांनी आदित्य ठाकरेंना थेट इशारा दिला आहे. आदित्य ठाकरे, तू मोदी, शाह, फडणवीस यांची नावं घेतलीस तर याद राख, अशा शब्दात नारायण राणेंनी ठाकरेंचना दम भरला. नारायण राणेंनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तर, खासदार संजय राऊत यांनाही एकप्रकारे इशाराच दिला आहे. मुंबईतील पावसाची आठवण सांगताना नारायणे राणेंनी 26 जुलै 2005 ची घटना सांगितली. काल मुंबईत अतिवृष्टी झाली, विरोधकांमध्ये हाहाकार उडाला आहे.










