रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कर्जतमध्ये वीज पडून एका युवकाचा मृत्यू झाला, तर उरणमध्ये दोघे जखमी झाले आहेत. कोंझर घाटातील रस्ता खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली असून हवामान विभागाने पुढील सात दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.अमुलकुमार जैन, अलिबाग: रायगड जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आगे. परिणामी घरांचे नुकसान झाले आणि वाहतूक विस्कळीत झाली. कर्जत तालुक्यात वीज पडून एका २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला, तर उरण तालुक्यात दोन जण जखमी झाले आहेत. रायगड किल्ल्याजवळील कोंझर घाटातील रस्ता खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुढील ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.राज्यात मान्सून वेळेआधीच दाखल झाला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. रायगड जिल्ह्यात आज सकाळी ९ वाजेपर्यंत अंधार पसरला होता. ढगांच्या गडगडाटाने आणि मुसळधार पावसाने लोकांना भयभीत केले. रायगड किल्ल्याच्या परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. “रेड अलर्ट खरा ठरला,” असे हवामान खात्याने म्हटले आहे.










