मोठी मुलगी घरातून पळून गेली होती. त्यामुळे हे कुटुंब खूप निराश झालं होतं. त्यातून त्यांनी आपल्या आयुष्याची अखेर करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण कुटुंब संपलं पण तरी ती मुलगी कुटुंबाच्या अंत्यसंस्कारालाही आली नाही.एकाच कुटुंबातील तिघांनी आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यातील एच.डी. कोटे तालुक्यात ही घटना घडल्याची माहिती आहे. बुदनूर गावात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. मोठी मुलगी घरातून पळून गेल्याने आपली समाजात बदनामी होईल असं कुटुंबाला वाटत होतं. त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे.महादेव स्वामी (वय 55), मंजुला (वय 45) आणि त्यांची लहान मुलगी हर्षिता अशी मृतांची नावं असल्याची माहिती आहे. या तिघांनी बुदनूरच्या तलावात उडी घेत आपला जीव दिला. त्यांची मोठी मुलगी घरातून पळून गेल्याने हे कुटुंब तणावात होते, असं सांगितलं जात आहे.शनिवारी (24 मे) सकाळी हे तिघेजण दुचाकीवरून तलावाजवळ आले. त्यांनी दुचाकी तिथेच उभी केली. चपला काढल्या आणि एक पत्र लिहिलं. त्यानंतर त्यांनी तलावात उडी घेतली.










