आगीत कंपनीतील १६ पैकी आठ प्रकल्प खाक झाले, तर नव्वद टक्के उत्पादन विभाग भक्ष्यस्थानी पडला आहे. प्रशासनाने तीन किमी परिसरासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून, एक किमी परिसरातील पाच गावे रिकामी केली आहेत.गतपुरीतील मुंढेगावजवळच्या जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीला लागलेली आग चाळीस तासांनंतरही आटोक्यात आलेली नाही. उलट गुरुवारी (दि. २२) तिची तीव्रता आणखी वाढली. आगीत कंपनीतील १६ पैकी आठ प्रकल्प खाक झाले, तर नव्वद टक्के उत्पादन विभाग भक्ष्यस्थानी पडला आहे. प्रशासनाने तीन किमी परिसरासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून, एक किमी परिसरातील पाच गावे रिकामी केली आहेत.
जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीत बुधवारी पहाटे दीडला आग लागली. कंपनीत पॉलिप्रिपिलिन चिप्सचा अतिज्वलनशील कच्च्या व पक्क्या मालाचा साठा असल्याने या आगीने रौद्र रूप धारण केले व ती विझवण्यात अडचणी येत आहेत. भिवंडी, शहापूर, पिंप्री-चिंचवड, ठाणे, अहिल्यानगर येथून मागवलेल्या सतरा ते वीस अग्निशमन बंबांद्वारे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ही आग पाण्याने विझत नसल्याने फोम व अन्य विशेष अग्निशामक बंब बोलावण्यात आले आहेत. पुणे येथून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) जवानांच्या तुकडीही दाखल झाली आहे.










