माजी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला बनावट प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने पूजाला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती नागरत्ना यांनी महत्वाचे निरीक्षण नोंदवले. तसेच न्यायालयाने पूजा खेडकरला तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.माजी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर हिला बनावट प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने खेडकर हिला तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे खेडकर हिला तूर्त मोठा दिलासा मिळाला आहे. संघ लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि अपंगत्व कोट्याअंतर्गत आरक्षण मिळविण्यासाठी फसवणूक केल्याचा पूजा खेडकर हिच्यावर आरोप आहे.










