पाकिस्तान सध्याच्या घडीला चारही बाजूंनी संकटात सापडला आहे. एकीकडे बलुचिस्तानात अस्थिरता निर्माण झालेली असताना दुसरीकडे सिंध प्रांत पेटला आहे. सिंधमधील जनता वादग्रस्त कालव्याच्या प्रकल्पाच्याविरोधात रस्त्यावर उतरली आहे.इस्लामाबाद: पाकिस्तान सध्याच्या घडीला चारही बाजूंनी संकटात सापडला आहे. एकीकडे अस्थिरता निर्माण झालेली असताना दुसरीकडे सिंध प्रांत पेटला आहे. सिंधमधील जनता वादग्रस्त कालव्याच्या प्रकल्पाच्याविरोधात रस्त्यावर उतरली आहे. आंदोलकांनी मंगळवारी सिंधचे गृह मंत्री जियाऊल हसन लंजर यांच्या घराला आग लावली. नौशेहरो फिरोज जिल्ह्यात गृहमंत्र्यांचं निवासस्थान आहे. आंदोलकांनी लंजर यांच्या मालमत्तेचं नुकसान केलं. घरातील सामान पेटवून दिलं.
आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ असलेल्या मोरो शहरातील मंत्र्यांच्या निवासस्थानला लक्ष्य केलं. त्या शेजारीच उभ्या असलेल्या दोन ट्रेलर्सलादेखील आग लावण्यात आली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. यामध्ये दोन आंदोलकांचा मृत्यू झाला. या संघर्षात एक डीसीपी आणि सहा पोलीस कर्मचारी यांच्यासह १० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.चोलिस्तान कालव्याच्या मुद्द्यावरुन पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या नेतृत्त्वाखालील सिंध सरकार आणि केंद्रातील शाहबाज सरकार यांच्यात वाद निर्माण झाला आहे.









