महापालिका निवडणुकीत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, मालेगाव मध्यचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल व माजी आमदार असिफ शेख, भाजप गटनेते सुनील गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये सत्तासंघर्ष होणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत. त्यामुळे मालेगाव महापालिकेच्या वर्तुळात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापालिका निवडणुकीत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, मालेगाव मध्यचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल व माजी आमदार असिफ शेख, भाजप गटनेते सुनील गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये सत्तासंघर्ष होणार आहे. मनपावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी यावेळी मोठी चढाओढ असून, त्यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.
२६ जून २०२२ रोजी मालेगाव महापालिकेची मुदत संपुष्टात आली. तब्बल ३४ महिने महापालिकेवर प्रशासकराज आहे . चार वेळा प्रभाग रचना होऊन रद्द झाली. आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यामुळे प्रभागातील राजकारण ढवळून निघाले आहे.२०१७ मध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक झाली होती. यात २१ प्रभागातून ८४ सदस्य निवडून गेले होते . गेल्या निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग रचनेचा फायदा शिवसेना व भाजपला पश्चिम भागात झाला, तर पूर्व भागात काँग्रेस व महागठबंधन आघाडीचे विक्रमी सदस्य निवडून आले होते. ‘ एमआयएम’ला केवळ सात जागांवरच समाधान मानावे लागले.









